दुचाकीवरून खवल्या मांजराच्या खवल्यांची तस्करी

दुचाकीवरून खवल्या मांजराच्या खवल्यांची तस्करी

पालीहुन बावनदीच्या दिशेने एक दुचाकीस्वार खवल्या मांजराच्या खवल्यांची तस्करी करत आहे अशी माहिती रत्नागिरी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचला. एक दुचाकी स्वार बावनदीच्या दिशेने येताना पोलिसांना दिसून आला. त्याच्या पाठीवर बॅग होती. या दुचाकीस्वाराचा पोलिसांना संशय आला. पोलिसांनी त्याला थांबवले आणि चौकशी केली असता त्याच्या पाठीवरच्या बॅगेत ४ किलो ३३६ ग्रॅम वजनाची खवल्या मांजराची खवले मिळाली. 

पाठीवरील बॅग, मोबाईल व खवल्या मांजराची खवले असा एकूण 30 हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. राकेश रामचंद्र धुळप असे संशयित आरोपीचे नाव आहे.

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस हेडकोन्स्टेबल शांताराम झोरे यांनी याबाबतची फिर्याद दाखल केली. त्यानुसार राकेशवर गुन्हा दाखल करण्यात आला. त्याला न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्याला ५ ऑक्टोबर पर्यत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

ही कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक मोहितकुमार गर्ग यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस हेडकोन्स्टेबल शांताराम झोरे, प्रशांत बोरकर, नितीन डोमणे, बाळू पालकर, पोलीस नाईक सत्यजित दरेकर, पोलीस शिपाई अतुल कांबळे यांनी केली. तसेच वनविभागाचे वनपाल गौतम कांबळे व वनरक्षक राहुल गुंठे यांनीही तपास कामात मदत केली. याबाबतचा अधिक तपास रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनकर सूर्य करत आहेत.