कोकणातील सर्वात उंच पूल वाहतुकीस खुला करण्यात आला आहे
Kokan Live Digital News:
सुमारे पाचशे किलोमीटर लांबीच्या मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणात राजापूर शहरानजीक शीळ-कोंढेतड यादरम्यान अर्जुना नदीवर उभारण्यात आलेल्या सर्वाधिक उंचीच्या पुलाचे काम मार्गी लागले असून हा पूल वाहतुकीस खुला करण्यात आला आहे.
या पुलामुळे राजापूरच्या मूळ निसर्गसौंदर्यात भर पडली असून या पुलावरून मार्गक्रमण करताना आनंददायी सफरीचा वेगळाच अनुभव प्रवाशांना घेता येणार आहे, तर महामार्गावरील सर्वाधिक उंचीच्या या पुलामुळे राजापूरची एक नवी ओळख राज्य आणि देशवासियांना होणार आहे.
बांधकाम क्षेत्रातील प्रसिद्ध केसीसी बिल्डकॉन कंपनीमार्फत वाटुळ ते तळगांव या सुमारे 33.5 किलोमीटर अंतराचे महामार्गाचे काम हाती घेण्यात आले असून या मार्गाचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. वाटुळ ते तळगांव या दरम्यान लहान मोठया 10 पुलांची उभारणी करण्यात आली आहे. त्यामध्ये वाटुळ व राजापूर येथे दोन मोठे पूल बांधण्यात आले आहेत. वाटुळ येथील पूल 66 मीटर लांबीचा आहे, तर अर्जुना नदीवर हा पूल 280 मीटर लांब व सुमारे 30 मीटर रुंदी आणि 27 मीटर उंच गडर पद्धतीने अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून उभारण्यात आला आहे. हा पूल राजापूर डेपो सारंगबागमार्गे थेट डोंगरतिठा असा जोडला गेला आहे. या दरम्यानची जवळजवळ 11 धोकादायक वळणे कमी होऊन सुमारे 1 किलोमीटर अंतर कमी होणार आहे.
त्यामुळे या पुलावरून प्रवास अत्यंत वेगवान आणि आरामदायी असा होणार आहे, तसेच या पुलावरून प्रवाशांना राजापूरच्या अनोख्या अशा निसर्गसौंदर्याचा अविष्कारही पहाता येणार असल्याने भविष्यात हा पूल म्हणजे एक पिकनिक स्पॉटही ठरणार असल्याचे बोलले जात आहे.
मुंबई ते गोवा असा सुमारे पाचशे किलोमिटरचा हा महामार्ग आहे. या महामार्गावर छोटे मोठे सुमारे ७० ते ७५ पुल आहेत. मात्र यात आता सर्वाधिक उंचीचा पुल म्हणून राजापूरच्या पुलाची ओळख निर्माण झाली आहे. सुमारे 280 मीटर लांबीचा अर्धा अर्जुना नदीपात्रावर व अर्धा पुढे जमिनीवरून जाणार हा पूल राजापूरच्या निसर्गसौंदर्यात भर घालत आहे. अर्धा नदीपात्रात आणि अर्था जमिनीवर असा हा महामार्गावरिल पहिला आणि एकमेव पुल आहे. थोडासा हटके आणि तिरकस अशा या भल्या मोठया पुलावरून ये जा करताना प्रवाशांच्या डोळयाचे पारणे फिटणार आहे. एका डोंगरातुन बाहेर पडून नदीपात्रावरून निसर्गसौंदर्य न्याहळत पुढचा सुखकर प्रवास करत जाताना प्रवाशांना एक वेगळा अनुभव या पुलाच्या माध्यमातून येणार आहे. महामार्गावरल सर्वात मोठा पूल पहाण्याचा आणि त्यावरून प्रवास करण्याचा आगळावेगळा आनंद प्रवाशांना या पुलावरून प्रवास करताना लुटता येणार आहे.
Bni salah transfer