लांजा महाविद्यालय व वन विभागाच्या संयुक्त विद्यमाने जागतिक व्याघ्र दिन उत्साहात

लांजा महाविद्यालय व वन विभागाच्या संयुक्त विद्यमाने जागतिक व्याघ्र दिन उत्साहात

➡️व्याघ्र संवर्धनाचा विद्यार्थ्यांनी दिला संदेश; टायगर फेस पेंटिंग व निबंध स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

लांजा : श्रीराम कुसुमताई सदाशिव वंजारे महाविद्यालय, लांजा आणि महाराष्ट्र राज्य वन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक व्याघ्र दिन उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांमध्ये वाघ संवर्धन, वन्यजीव संरक्षण आणि जैवविविधतेचे महत्त्व याबाबत जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

दरवर्षी २९ जुलै रोजी जागतिक व्याघ्र दिन साजरा केला जातो. वाघ हा जंगलातील अन्नसाखळीतील सर्वोच्च घटक असून, जंगलातील पर्यावरणीय समतोल राखण्यात त्याची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. वाघांचे संरक्षण आणि त्यांच्या घटत्या संख्येबाबत जनजागृती करण्यासाठी या दिनाचे आयोजन केले जाते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. सुवर्णा पाटील होत्या. रत्नागिरी प्रादेशिक विभागाचे वनक्षेत्रपाल विक्रम गुरव प्रमुख पाहुणे म्हणून, तर सामाजिक वनीकरण विभाग, लांजाचे वनक्षेत्रपाल साहेल शेख उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

यावेळी विक्रम गुरव व साहेल शेख यांनी विद्यार्थ्यांना वाघ संवर्धनाचे महत्त्व पटवून दिले. वाघ हा अन्नसाखळीतील सर्वोच्च घटक असून त्याच्या अस्तित्वामुळे जंगलातील पर्यावरणीय समतोल राखण्यास मदत होते. वाघांचे अधिवास, जंगल आणि जलस्रोत यांच्या संरक्षणासाठी वाघांचे संवर्धन आवश्यक आहे. वाघांची बेकायदेशीर शिकार तसेच त्यांच्या अवयवांच्या अवैध व्यापाराविरोधात समाजात जनजागृती होणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांनी वन्यजीव संवर्धनाच्या कार्यात सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.

व्याघ्र दिनाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांसाठी ‘टायगर फेस पेंटिंग’ तसेच ‘व्याघ्र संवर्धन’ या विषयावर निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी आपल्या चेहऱ्यावर वाघाचे आकर्षक मुखचित्र साकारत तसेच निबंधाच्या माध्यमातून वाघ संवर्धनाचा संदेश दिला. या उपक्रमात एकूण ३५ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.

‘टायगर फेस पेंटिंग’ स्पर्धेत कु. भक्ती जाधव व याशिका ठकराल यांनी प्रथम क्रमांक मिळविला, तर मृण्मयी करंजकर व रिया कांबळे यांनी द्वितीय क्रमांक पटकावला. स्पर्धेतील विजेत्यांना वन विभागाच्या वतीने चषक देऊन गौरविण्यात आले. तसेच विजेते आणि सहभागी विद्यार्थ्यांना देशी प्रजातींची वृक्षरोपे भेट देण्यात आली. वाघ संवर्धनासोबतच पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणाऱ्या या उपक्रमाचे उपस्थितांकडून कौतुक करण्यात आले.

कार्यक्रमाचे आयोजन व सूत्रसंचालन महाविद्यालयाच्या प्राणीशास्त्र विभागाचे विभागप्रमुख डॉ. विक्रांत बेर्डे यांनी केले. यावेळी त्यांनी जागतिक स्तरावर वाघांची संख्या सुमारे ५,६०० तर भारतात सुमारे ३,७०० असल्याचे सांगितले. भारताचा राष्ट्रीय प्राणी असलेल्या वाघाचे अस्तित्व टिकविण्यासाठी प्रत्येकाने योगदान देणे गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले. वाघ नामशेष होऊ नये यासाठी वन्यजीव संवर्धनाबाबतची जाणीव समाजात निर्माण करणे आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले.

पाहुण्यांचे आभार डॉ. दिग्विजय लवटे यांनी मानले. त्यांनी विद्यार्थ्यांशी जंगलातील अभ्यास व अनुभवांविषयी संवाद साधत वन्यजीव आणि त्यांच्या अधिवासाचे महत्त्व स्पष्ट केले.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वनपाल धुलू कोळेकर, वनरक्षक सचिन कांबळे, श्रावणी पवार, सिद्धार्थ हिंगमिरे व नमिता कांबळे यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाला महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, वन विभागाचे अधिकारी-कर्मचारी तसेच बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते.

वाघाबद्दल भीती न बाळगता त्याच्या अधिवासाचे संरक्षण, वन्यजीव संवर्धन आणि जैवविविधता जपण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन वन विभाग व सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीने करण्यात आले.