लांजा तालुक्यातील पेडणेकर हायस्कूलमध्ये गुरुपौर्णिमा कार्यक्रम संपन्न

लांजा तालुक्यातील पेडणेकर हायस्कूलमध्ये गुरुपौर्णिमा कार्यक्रम संपन्न

लांजा : प्रतिनिधी 
 कोकण मराठी साहित्य परिषद शाखा लांजा व जगन्नाथ गंगाराम पेडणेकर माध्यमिक विद्यालय, तळवडे यांच्या संयुक्त विद्यमाने  गुरुपौर्णिमा कार्यक्रम पेडणेकर हायस्कूल येथे पार पडला.
      प्रथम दीपप्रज्वन व  सरस्वती प्रतिमा पूजन करण्यात आले. यावेळी ' गुरूवे नम:' हे गीत रेश्मा नामये, पूजा गुरव, श्रावणी दरडे, तन्वी कोलापटे, दिक्षा मांडवकर, लतिका सावंत, कस्तुरी मेस्त्री, रुद्रा झोरे यांनी गायले.  कार्यक्रमाला व्यासपीठावर कोमसापच्या लांजा शाखेचे अध्यक्ष रामचंद्र जाधव, उपाध्यक्ष डॉ. माया तिरमारे, प्रशालेचे मुख्याध्यापक भीमराव खोत, सुरेखा विभूते, मधुरा तिरमारे आदी मान्यवर उपस्थित होते. प्रशालेच्यावतीने उपस्थितांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर कोमसापच्या लांजा शाखेच्यावतीने गुरुपौर्णिमेनिमित्त रामचंद्र जाधव यांनी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा सन्मान केला. प्रशालेतील विद्यार्थिनी सोनाली कदम हिने गुरू पौर्णिमेच्या निमित्ताने आपल्या जीवनातील गुरूंचे स्थान सांगितले. त्यानंतर मुक्ता खामकर हिने  गुरूदक्षिणा कथा सांगितली. कार्यक्रमातील प्रमुख व्याख्यात्या डॉ. माया तिरमारे यांनी गुरुमहात्म्य सांगताना निसर्ग हा कसा गुरू आहे हे सोदाहरण स्पष्ट केले. अंधारातून प्रकाशाकडे वाटचाल करण्याचे धाडस निर्माण करण्याचे बळ गुरू देतो तसेच जीवनाला दिशा देण्याचे काम गुरू करतात असं त्या म्हणाल्या.   
           कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रकाश हर्चेकर यांनी केले तर आभार नेहा पाटोळे यांनी मानले. कार्यक्रमाला बाळासाहेब आवटे, दादासाहेब पाटील, प्रभाकर सनगरे, गणेश झोरे, स्वरा वासुरकर, स्नेहा कोत्रे, विजय पाटोळे, विजय चव्हाण आदी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कोमसाप लांजा शाखेच्यावतीने सचिव अरबाज नेवरेकर, विनोद बेनकर, जिल्हा प्रतिनिधी राजेश गोसावी यांनी मेहनत घेतली.