पालघर येथे 11 व 12 जून रोजी कोकण मराठी साहित्य परिषदेचे राज्यस्तरीय महिला साहित्य संमेलन पार पडले

विविध क्षेत्रातील यशाचे उत्तुंग शिखर गाठणा-या महिलांचे अनुभव कथन ऐकण्याचा योग कोमसापच्या महिला साहित्य संमेलनाच्या निमित्ताने आला.

स्त्री एक माणूस आहे, एक व्यक्ती आहे हा विचार स्त्रियांना आत्मनिर्भरतेकडे नेणारा आहे, स्त्रियांच्या आत्मनिर्भरतेची क्षितिजे अजून विस्तारली पाहिजेत आणि ती जेव्हा ठरवती होईल, नुसती मिळवती नाही तेव्हाच ती ख-या अर्थाने आत्मनिर्भर होईल असे विचार अनुभव कथन परिसंवादाच्या अध्यक्षा मा. प्रा. वृषाली मगदूम यांनी मांडले.

या कार्यक्रमातील संवादक मेघना साने यांनी कार्यक्रमात सहभागी महिलांशी संवाद साधला.

अमृता भालेराव या व्यवसायाने शिक्षिका असून यशस्वी गिर्यारोहक आहेत. त्यांनी भारताच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त किलीमांजरो या आफ्रिकेतील 19 हजार फुट (जगातील पाचव्या क्रमांकाचे उंच शिखर) उंच शिखर सर करून तेथे तिरंगा फडकविण्याचे स्वप्न पाहिले व 26 जानेवारी 2022 रोजी प्रत्यक्षात जगले.

सुनिता रामचंद्रन या सायकलपटूनी सायकलमुळे मुक्ततेचा श्वास घेता येतो, निसर्ग - माणसांशी संवाद साधता येतो असे सायकलचे फायदे सांगितले.

तनुजा काबरे यांनी फौजी की पाठशाला या आपल्या उपक्रमाविषयी सांगितले. यातून विद्यार्थ्यां सैन्यात भरती होणेच नव्हे तर कोणत्याही क्षेत्रात करिअर करण्यासाठी हे प्रशिक्षण उपयुक्त आहे.

अनुजा संखे या पत्रकार असून अंध आहेत. पत्रकार होण्याचा निर्णय त्यांनी शाळेत शिकत असतानाच घेतला होता.
आपल्या संघर्षा विषयी त्या म्हणाल्या, "चौकटीबाहेर जाऊन कार्य करण्यासाठी अंध व्यक्तीना संघर्ष करावा लागतो."
आज तंत्रज्ञानाच्या साह्याने वाचन लेखन करणे अंधांसाठी सोपे झाले आहे.


डाॅ. कल्पना खराडे ह्या शिक्षणतज्ज्ञ असून त्या अंध आहेत. त्या डोळ्यांच्या उपचारासाठी रशियाला गेल्या व तेथेच आपले Phd पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले.
अंध विद्यार्थ्यांना वेगळ्या शाळेत न शिकवता सर्वसामान्य शाळांतच शिक्षण द्यावे, यासाठी शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात यावे. योग्य अध्यापन पद्धती व योग्य साहित्य यांच्या मदतीने अंध विद्यार्थ्यांना मुख्य प्रवाहात आणता येईल.

संगीता धायगुडे यांनी पतीच्या निधनानंतर आपली मनस्थिती व समाजाकडून आलेल्या कटू अनुभवातून उभारी घेण्यासाठी अधिकारी होण्याचा निर्णय घेतला व MPSC परीक्षेत यश प्राप्त केले. स्वच्छ महिला अधिकारी म्हणून केलेल्या कार्याविषयी सांगितले.