संगमेश्वर तालुक्यातील धामापूर येथे जंगलमय भागात बिबट्या फासकीत अडकून मृत

संगमेश्वर तालुक्यातील धामापूर येथे जंगलमय भागात बिबट्या फासकीत अडकून मृत
संगमेश्वर जंगल भाग

संगमेश्वर तालुक्यातील धामापूर गावात गणपती विसर्जन घाट शेजारी कांबळे नामक ग्रामस्थांची जागा आहे. या जागेमध्ये एका झाडाला अज्ञात व्यक्तीने वन्यप्राण्यां शिकारीसाठी फासकी लावली होती. या फासकीमध्ये बिबट्या अडकून मृत झाला. येथील शेतकऱ्यांनी आपली जनावरे त्या भागामध्ये चरण्यासाठी सोडली होती.

बिबट्याला पाहून जनावरे बिथरली. ही बाब शेतकऱ्यांच्या लक्ष येताच त्यांनी जंगलमय भागाची पाहणी केली. यावेळी बिबट्या फासकी मध्ये अडकून मृत्यू झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. ग्रामस्थांनी या घटनेची माहिती वनविभागाला कळवली. यानंतर देवरुखचे वनपाल तैफिक मुल्ला, वनरक्षक नानू गावडे यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी व पंचनामा केला.

विभागीय वना अधिकारी दीपक खाडे व परिक्षेत्र वनाधिकारी राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मार्फत या बिबट्या चे शव विच्छेदन करण्यात आले. पोटाच्या भागाला फासकी लागून त्याचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. याच ठिकाणी बिबट्याला अग्नी देण्यात आला. हा बिबट्या नर जातीचा व सात वर्षे पूर्ण वाढीचा असल्याची माहिती वनपाल तैफिक मुल्ला यांनी दिली आहे. ही फासकी कोणी लावली याचा वनविभागाचे अधिकारी शोध घेत आहेत.