मुसळधार पावसामुळे लांजा येथे मुंबई गोवा महामार्गावर वाहतूक धीम्यागतीने
मुंबई गोवा महामार्ग चौपदरीकरण कामात महामार्गच्या बाजूला व्यवस्थित गटारे न बांधल्याने आज मुसळधार पडलेल्या पावसाचे पाणी व चिखल अंजणारी स्टॉप येथील दुकानामध्ये शिरले. त्यामुळे दुकानांचे मोठे नुकसान झाले. यासह महामार्गावर पाणी व चिखलाचे साम्राज्य पसरल्याने महामार्गावरील वाहतूक संथ गतीने सुरू होती.
पावसाळ्याच्या सुरूवातीलाच महामार्गावर दरड कोसळणे, रस्ता खचने, झाडे पडणे, महमार्गाला भेगा पडणे अशा घटना घडू लागल्या आहेत. आज मुसळधारपणे पाऊस पडत आहे. दरम्यान पावसाळ्यापूर्वी सुरू केलेल्या महामार्गच्या अर्धवट कामाचा त्रास वाहन चालक व नागरिकांना बसत आहे. आज मुसळधार पाऊस झाल्याने पावसाचे पाणी शिरल्याने लांजा तालुक्यातील अंजणारी येथील दुकानांना मोठा फटका बसला. अंजणारी घाटात महामार्गाच्या बाजूने सुस्थितीत गटारे न काढल्याने व गटारामधील माती न काढल्याने पावसाचे पाणी व माती गटारात साठून महामार्गावर आली. तीव्र अंजणारी घाटात तीव्र उतार असल्याने पावसाचे पाणी दुकानात शिरले. अंजणारी बस स्टॉप व दुकानासमोरील परिसर जलमय झाला होता.
पाणी, चिखल व माती मुंबई-गोवा महामार्गावर आल्याने अंजणारी येथे महामार्गावरील वाहतूक मंदावली होती. या घटनेची माहिती नागरिकांनी महामार्ग ठेकेदाराला दिली असता जेसीबीच्या साहाय्याने महामार्गावर आलेली माती बाजूला करण्यात आली.
Bni salah transfer