स्वतःच्या बापाच्या डोक्यात हातोडा घालून मुलाने केला खून लांजा तालुक्यातील घटना

स्वतःच्या बापाच्या डोक्यात हातोडा घालून मुलाने केला खून लांजा तालुक्यातील घटना

तालुकयातील पुनस बौद्धवाडी येथील अल्पवयीन १७ वर्षीय मुलाने आपल्या वडिलांच्या डोक्यात लोखंडी हातोडा मारून त्यांचा खून केला. ही घटना शनिवारी २१ मार्च रोजी रात्री १२.३० वाजण्याच्या दरम्याने येथे घडली. या प्रकरणी अल्पवयीन मुलावर लांजा पोलिस ठाण्यात मंगळवारी २२ मार्च रोजी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या खुनामागचे कारण ऐकून सारेचजण हादरले असून वडील सतत या मुलाला, ‘तू माझा मुलगा नाहीस’, असे वारंवार हिणवत असत. या रागातूनच या अल्पवयीन मुलाने हे कृत्य केल्याचे कारण पुढे आले आहे.

लांजा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पुनस बौद्धवाडी येथील रहिवासी असलेले रवींद्र रावजी कांबळे (वय ४०) हे त्यांची पत्नी रेशमी हिच्या चारित्र्यावर सतत संशय घेत असत. त्याचप्रमाणे मुलगा अभिजीत कांबळे याला देखील तू माझा मुलगा नाहीस असे ते वारंवार बोलून त्याला हिणवत असत. प्रत्येक वेळी ते भांडण करून त्याला अशाप्रकारे बोलत असत. सोमवारी २१ मार्च रोजी रात्री साडे बाराच्या दरम्याने पुन्हा रविंद्र कांबळे यांनी पत्नी रेशमी हिच्याशी भांडण केले. मुलगा अभिजीत याला देखील ‘तू माझा मुलगा नाहीस’ असे म्हणत हिणवयाला सुरुवात केली. मात्र यावेळी अभिजीतचा स्वतःच्या रागावरचा ताबा सुटला आणि त्याने घरातील लोखंडी हातोडा आणून तो थेट वडील रवींद्र कांबळे यांच्या डोक्‍यावर मागील बाजूने जोरदारपणे मारला. यात ते गंभीर जखमी झाले होते.

रवींद्र कांबळे यांना शनिवारी रात्रीच जिल्हा शासकीय रुग्णालयात गंभीर अवस्थेत दाखल करण्यात आले होते. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर लांजा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक दादासाहेब घुटुगडे हे सहकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी अभिजीत कांबळे याला ताब्यात घेऊन त्याच्यावर भा.दं.वि. कलम ३०७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात केला. दरम्यान जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार घेत असलेले रविंद्र कांबळे यांचा मंगळवारी २२ मार्च रोजी मृत्यू झाला होता. त्यामुळे वडिलांच्या मृत्यू प्रकरणी अखेर लांजा पोलिसांनी मुलगा अभिजीत कांबळे याच्यावर ३०२ प्रमाणे खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. याबाबत अधिक तपास लांजा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक दादासाहेब घुटुगडे हे करत आहेत. मात्र या घटनेमुळे आणि त्यामागे असलेल्या कारणामुळे सारेचजण हादरले आहेत.