"गोरगरिबांचे धन्वंतरी" डॉ. अनिल त्र्यंबक पत्की यांचा लांजा मध्ये जाहीर सत्कार
रुबीन मुजावर
कोकण लाईव्ह डिजिटल न्यूज
"स्वधर्म कर्माचे पालन करणारे डाॅ.अनिल पत्की गोरगरिबांचे धन्वंतरी"
---- डाॅ.विजय आठल्ये.
वाट्याला आलेले कर्म मन लावून, स्वतःच्या सुखाचा विचार न करता, स्वार्थ न बाळगता करत राहणे म्हणजे स्वधर्म कर्म होय.अशाच स्वधर्म कर्माचे पालन करणारे डाॅक्टर म्हणजे डाॅ.अनिल पत्की होय.असे प्रतिपादन डाॅ.विजय आठल्ये यांनी लांजा येथे केले.
डॉक्टर अनिल पत्की यांनी केलेल्या कार्याचा कृतज्ञता सोहळा रविवारी २० मार्च रोजी गणेश मंगल कार्यालय लांजा येथे पार पडला .या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून डॉक्टर विजय आठले बोलत होते.यावेळी ते म्हणाले
वैद्यकीय व्यवसाय सोबत आपण समाजासाठी काहीतरी केले पाहिजे या भावनेतून धडपड करणाऱ्या डॉक्टर अनिल पत्की यांचे लांजा शहराच्या जडणघडणीमध्ये मोलाचे योगदान आहे अशा व्यक्तींच्या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे हे तुमचे आमचे सर्वांचे कर्तव्य आहे असे मत डॉक्टर विजय आठल्ये यांनी लांजा येथे व्यक्त केले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान न्यू एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष जयवंत शेट्ये यांनी भूषविले तर कार्यक्रमाला प्रमुख मान्यवर म्हणून व्यासपीठावर नगराध्यक्ष मनोहर बाईत, श्रीराम उर्फ भाऊसाहेब वंजारे,कोल्हापूर येथील उद्योजक दिलीप गुणे, लोकप्रभाचे माजी सहसंपादक ज्येष्ठ पत्रकार पराग पाटील, महंमद रखांगी ,सौ.अमिता पत्की ,आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरवातीला डाॅ.अनिल पत्की यांच्या आजवरच्या वाटचालीची वेध घेणारी दुरचित्रफित दाखविण्यात आली.यानंतर मान्यवरांच्या शुभहस्ते धन्वंतरी देवतेचे प्रतिमापुजन व दीपप्रज्वलन करण्यात आले.डाॅ.अनिल पत्की यांच्या विषयी अनेक मान्यवरांनी लिहिलेल्या व विजय बेर्डे सर यांनी संपादित केलेल्या " सर्वसामान्यांचा धन्वंतरी " या विशेषांकाचे प्रकाशन यावेळी मान्यवरांच्या शुभ हस्ते करण्यात आले.कार्यक्रामचे प्रास्ताविक विजय बेर्डे यांनी केले.यावेळी गौरव सोहळा समीतीचे अध्यक्ष महंमद रखांगी यांनी डाॅ.पत्की गेली पाच दशके लांजासारख्या ग्रामीण भागात निस्सिम भावनेने वैद्यकीय सेवा करित असून आजवरच्या वाटचालीत त्यांनी कितीतरी रुग्णांचे प्राण वाचवण्याचे सत्कार्य केले असून त्यांचे कार्य वैद्यकीय क्षेत्रात काम करणा-या डाॅक्टरांसाठी दीपस्तंभासारखे असून वैद्यकीय क्षेत्रासोबतच शैक्षणिक सामाजिक क्षेत्रात वावर असलेल्या डाॅ.पत्किंचा आदर्श जीवनपट उपस्थितांसमोर मांडतानाच समाजासाठी कार्यरत राहणा-या,गोरगरिबांच्या सेवेसाठी झटणा-या निष्काम कर्मयोग्यांची समाज दखल घेत असतो याचे आदर्श उदाहरण म्हणजे डाॅ.पत्कींचा सत्कारसोहळा असल्याचे मत व्यक्त केले.
लोकप्रभाचे माजी उपसंपादक पराग पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगतिले की, डाॅ.पत्की यांचा एकत्र कुटुंबपद्धतीवर विश्वास आहे.त्यांचे घर हे आजच्या विभक्त कुटुंब पद्धतीच्या काळात एक आदर्श कुटुंब आहे.परंतु डाॅ.पत्की तेवढ्यापुरतेच मर्यादित नसून सारे लांजावासीय म्हणजेच डाॅक्टरांचं कुटुंब असल्याचे दृश्य आज मला या ठिकाणी अनुभवता आले.त्यांच्या गौरवाला त्यांचं कुटुंब म्हणजे लांजावासीय मोठ्या संख्येने उपस्थित आहेत.ही त्यांच्या सत्कार्याची पोचपावती असल्याचे मत पाटील यांनी व्यक्त केले.याबरोबर उद्योजक दिलीप गुणे यांनीही डाॅ.पत्कींंना शुभेच्छा देत त्यांच्या यशस्वी वाटचालीचे कौतुक केले.
या कृतज्ञता सत्काराला उत्तर देताना डॉक्टर अनिल पत्की म्हणाले की, डाॅक्टर होताना शपथ घेऊन जे कबुल केले तेच कर्तव्य आजपर्यंत मी केले.गेल्या ४६ वर्षात लांजावासीयानी मला सर्व काही दिले.त्याने मी कृतकृत्य झाल्याची भावना व्यक्त करताना आज डाॅक्टर विजय आठल्ये यांनी माझ्या पाठीवर शाल घातली तेव्हा क्षणभर माझे स्वामी स्वरुपानंदच माझ्या पाठीवरुन हात फिरवित अाहेत.याची दैवीअनूभूती मला आली. इतक्या उंचीचा व्यक्तिमत्वाकडून माझा सत्कार हे माझे भाग्य असल्याची भावना व्यक्त करताना डाॅ.पत्की यांनी आपला वैद्यकीय सेवेचा पट उपस्थितांसमोर उलगडीला.
मी जेव्हा लांज्यात वैद्यकीय सेवेला सुरवात केली तेव्हा इथल्या ग्रामीण भागातून येणा-या रुग्णांकडे रुग्णसेवेची फी द्यायला घरात पैसे नसायचे. असे अठराविश्व दारिद्र्य पाहिल्यानंतर मी ठरविले गोरगरिबांना जेवढी वैद्यकीय सेवा देता येईल तेवढी देण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करत रहायचे. म्हणूनच त्यांच्या या आशीर्वादामुळे माझा आज या ठिकाणी माझा सत्कार केला जातोय.समाजभावनेचं काम समाजमन घेऊन केलं तर यश मिळतं यावर माझा नितांत विश्वास असून यापुढेही समाजासाठी जे जे काही चांगले करता येईल ते ते मी करत राहणार आहे,तसेच माझ्या पाठोपाठ आता माझा मुलगाही या क्षेत्रात काम करत आहे त्यामुळे मला माझ्या मुलाला याठिकाणी बोलावून सन्मान प्रदान केला आहे या सन्मानाची उंची कायम ठेवण्याचा प्रयत्न आम्ही दोघेही करु राहील याची ग्वाही देत ,मी सर्वसामान्यांचा डाॅक्टर असून आजचा हा सत्कार मी माझ्या सर्वसामान्य तळागाळातील रुग्णांना समर्पित करतो असे
सांगत डाॅ.पत्की यांनी वैद्यकीय क्षेत्रात काम करताना
एका व्यक्तिकडून दुस-या व्यक्तिकडे आपल्या सेवेची प्रसिद्धी जाते ,यातूनच डाॅक्टर म्हणून वैद्यकीय व्यवसायात यश मिळत असते असे सांगत व्यवसाय कोणताही असो ,व्यवसाय करताना मिळाळेल्या लाभांशापैकी ५ ते १० टक्के लाभांशाचा उपयोग समाजसेवेसाठी करा असा वडिलकीचा सल्लाही त्यांनी उपस्थितांना केला.
या कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवरांची मोठी हजेरी दिसली. शहरातील विविध सामाजिक ,सांस्कृतिक, राजकीय संघटनांचे पदाधिकारी ,महाविद्यालयीन प्राध्यापक प्राचार्य , प्राथमिक व माध्यमिक शाळांमधील शिक्षक वर्ग लांजा शहरातील ज्येष्ठ नागरिक, युवावर्ग ,शहरातील सर्व डॉक्टर ,मेडिकल व्यवसायिक तसेच डॉक्टर अनिल पत्की यांच्या हितचिंतकांनी या कार्यक्रमाला मोठी हजेरी लावली होती. हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी गौरव समितीचे अध्यक्ष महम्मद रखांगी,राजु कुरुप, विनय बुटाला, संजय तेंडुलकर, परवेश घारे, विजय खवळे, विजय हटकर, पुरूषोत्तम साळवी, राजेश शेट्ये,अॅड.यशवंत पाटकर, प्रसन्न शेट्ये , कुंदन गांधी, सुरेश राणे, रणजीत सार्दळ, प्राध्यापक महेश बावधनकर, प्राध्या.शेवडे सर यांनी विशेष मेहनत घेतली तसेच या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राहुल मराठे यांनी केले. ह्या कृतज्ञता सोहळ्यासाठी हजारो लोकांची उपस्थिती पाहून डॉक्टर अनिल पत्की यांचे कार्य कशा पद्धतीने आदर्शवत होते ,याचे चित्र या ठिकाणी पहायला मिळाले.
Bni salah transfer