बचत गटांना कर्ज वितरण करताना संवेदनशील दृष्टीकोन जागृत ठेवायला हवा

बचत गटांना कर्ज वितरण करताना संवेदनशील दृष्टीकोन  जागृत ठेवायला हवा

सर्व बँकर्सनी ग्रामीण भागातील बचत गटांना कर्ज वितरण करताना संवेदनशील दृष्टीकोन  जागृत ठेवायला हवा, असे प्रतिपादन अभियानाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. हेमंत वसेकर यांनी केले.

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या राज्य कक्षाने आज नवी मुंबई कार्यालयात राज्यातील सर्व सार्वजनिक, खासगी व सहकारी क्षेत्रातील बँकर्सच्या राज्यस्तरीय प्रमुखांची विशेष कार्यशाळा आयोजित केली होती. राज्यातील स्वयंसहायता समूहांना योग्यवेळी पतपुरवठा उपलब्ध करणे, खाते उघडणे, समूह सदस्यांना विमा सुरक्षा कवच उपलब्ध करणे इ. महत्वाच्या विषयांवर या कार्यशाळेत चर्चा करण्यात आली.

 राज्यातील सर्व बँकर्स सोबत आयोजित चर्चासंवादात बँकांनी केलेल्या कामगिरीबाबत बँकनिहाय सारासार विचार केला गेला.  कार्यशाळेमध्ये महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाचे अतिरिक्त संचालक श्री.परमेश्वर राऊत यांनी सादरीकरण केले. यावेळी श्री.राऊत यांनी रिझर्व बँकेच्या निर्देशांप्रमाणे बँकांनी प्राधान्य क्षेत्राला पतपुरवठा करणे अपेक्षित आहे, यामुळे वंचित घटकांना उपजिवीकेची साधने उपलब्ध होऊन ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळते असे प्रतिपादन केले. तसेच प्रत्येक बँकेची उद्दिष्ट व साध्य, बँकांचा प्रादेशिक विभागनिहाय दृष्टीकोन, भविष्यातील नियोजन आणि उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या बँकांसाठी प्रोत्साहन कार्यक्रम याविषयी माहिती दिली.

एचडीएफसी बँकेने पतपुरवठ्याचे उद्दिष्ट पूर्ण  केल्याबद्दल बँकेला अभियानाकडून गौरविण्यात आले. एचडीएफसी बँकेने त्यांनी अंगिकारलेल्या  कार्यपद्धतीबद्दल अन्य बँक प्रमुखांना माहिती देण्यात आली.

            याच कार्यशाळेत बँक ऑफ इंडिया सोबत ग्रामीण बचत गटांना अल्पदराने पतपुरवठा करण्याबाबत सामंजस्य करारही यावेळी करण्यात आला.राज्यस्तरीय बँकर्स समितीच्या वतीने श्री.राजेश देशमुख यांनी राज्यातील सर्व बँका महिला स्वयंसहायता समूहांना सर्वप्रकारे साकारात्मक मदत करतील व महाराष्ट्र हे देशात सर्वात पुढे राहील यासाठी प्रयत्न करतील असे प्रतिपादन केले.

 यावेळी अभियानाचे उपसंचालक डॉ.राजेश जोगदंड, अभियान व्यवस्थापक श्रीमती. कावेरी पवार राज्यातील सर्व प्रमुख बँकांचे अधिकारी, प्रतिनिधी आदि उपस्थित होते.