लांजा आगारातील एक वाहक सेवानिवृत्त झाला शेवटच्या दिवशी सर्व फेऱ्यांमध्ये प्रवाशांकडून पैसे न घेता सर्वांचे पैसे स्वतः भरले
रुबीन मुजावर
कोकण लाईव्ह डिजिटल न्यूज
लांजा आगारातील सेवाभावी वाहक श्री.सुल्तान इब्राहीम मापारी हे नुकतेच सेवानिवृत्त झाले आहेत. ३० वर्षापूर्वी १९९२ साली ते लांजा आगारात सेवेत रुजू झाले होते. नुकताच त्यांचा निरोप समारंभ लांजा आगारात पार पडला
सुल्तान मापारी हे लांजा तालुक्यातील देवधे येथील रहिवासी आहेत. या काळात त्यांनी ३० वर्षे निष्कलंक उत्तम सेवा दिली. सेवानिवृत्तीनंतर लांजा अगाराच्यावतीने त्यांचा निरोप समारंभ ३० जून रोजी लांजा आगारात मोठया उत्साहात पार पडला. त्यांनी दिलेल्या निष्कलंक सेवेबद्दल तसेच त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचा गुन्हा नसल्याने त्यांना एक वेतनवाढ ज्यादा व त्याचा फरक देण्यात आला.
विशेष म्हणजे श्री.सुल्तान मापारी यांनी नोकरीच्या शेवटच्या दिवशी त्यांच्या दिवसभरात जेवढया फेऱ्या झाल्यात त्या सर्व फेऱ्यांमध्ये जेवढे प्रवासी होते, त्या प्रत्येक प्रवाशाचे तिकीटचे पैसे मापारी यांनी स्वतः भरले. असे करणारे महाराष्ट्रातील ते पहिले वाहक असल्याचे आगार प्रमुख संदीप पाटील यांनी निरोप समारंभ कार्यक्रमावेळी सांगितले. निरोप समारंभावेळी सेवानिवृत्तिच्या दिवशी श्री.सुल्तान मापारी हे वाहकाच्या गणवेशात आल्याने त्यांनी आगाराचा व महामंडळाचा आदर राखल्यामुळे सर्वांकडून त्यांचे कौतुक करण्यात आले. तसेच पुढील आयुष्यासाठी त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी मापारी यांच्या निरोप समारंभ कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून महंमदशेठ रखांगी, आगार व्यवस्थापक संदीप पाटील, कर्मचारी राजू पाटोळे, दिलीप सावंत, चंद्रकांत झोरे, राजेशिर्के तसेच मापारी यांचे सर्व कुटुंबिय व लांजा आगारातील इतर कर्मचारी, संघटनेचे पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते. दरम्यान अत्यंत मनमिळावू स्वभावामुळे श्री.सुल्तान मापारी सेवा बजावताना सर्वांनाच लोकप्रिय ठरले आहेत.
Bni salah transfer