पाण्यासाठी एकवटला जनप्रवाह दहा गावांच्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी निसर्गरम्य चिपळूण आणि निसर्गरम्य संगमेश्वर फेसबुक ग्रुप कडून प्रयत्न

पाण्यासाठी एकवटला जनप्रवाह दहा गावांच्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी निसर्गरम्य चिपळूण आणि निसर्गरम्य संगमेश्वर फेसबुक ग्रुप कडून प्रयत्न

 रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यात असणार्या अंत्रवली शेरेवाडी आणि परिसरातील दहा गावांमध्ये सध्या भीषण पाणी टंचाईचे संकट उभे राहिले होते. यावर मात करण्यासाठी निसर्गरम्य चिपळूण-निसर्गरम्य संगमेश्वर फेसबुक ग्रुपच्या माध्यमातून तरुणाईने एकत्र येऊन मदतीचा हात पुढे केला. त्यासाठी जनसामान्यांचा सहभागही घेण्यात आला असून या उपक्रमासाठी मुंबई, ठाणे येथून पाणी समस्याग्रस्त ग्रामस्थांना सहकार्य केले जात आहे. ‘जल हेच जीवन, जल है तो कल है’ वगैरे घोषणा केवळ कागदोपत्री न राहता आपल्या मूळ गावातील ग्रामस्थांच्या पाणी प्रश्नाला वाचा फोडून जनसमस्या निवारणासाठी तरुणाई एकवटली असल्याचे या फेसबुक ग्रुपचे प्रमुख पत्रकार संदेश जिमन यांनी सांगितले.


संगमेश्वर येथील उमरे धरणातील पाणी कोणतीही पूर्वसूचना न देता नदी पात्रात सोडण्यात आले. त्यामुळे परिसरातील दहा गावांमध्ये पाणी टंचाई भेडसावू लागली. या गावांमध्ये आता टँकरने पाणी पुरवठा करण्यात येत आहे. परंतु शासकीय पातळीवरील पाणी पुरवठ्यासाठी येणार्या टँकरची वाट बघत बघणे हेच या दहा गावांतील ग्रामस्थांच्या नशिबी आले आहे. टँकरच्या येण्याच्या वेळा अनियमित असून, कधीकधी टँकर गावात येतही नाहीत. त्यामुळे पाण्यावाचून गावकर्यांचेअ तिशय हाल होत आहेत.

या समस्येवर तोडगा म्हणून केवळ शासकीय पातळीवर पाठपुरावा न करता, प्रत्यक्षात जनमानसाचा सहभाग मोलाचा आहे, हे समजून संदेश जिमन आणि त्यांच्या सहकार्यांनी ज्या गावांमध्ये
अजिबात पाणी पुरवठा होत नाही, तिथे खासगी पातळीवर टँकरद्वारे पाणी पुरवण्याचे ठरवले. या कार्यात या तरुणाईला
मुंबईतील चाकरमान्यांकडून उत्तम प्रकारे प्रतिसाद मिळाला असून अनेकांनी टँकरच्या भाड्याचे, पाण्याचे मूल्य म्हणून
आपल्या परीने आर्थिक सहकार्य केले आहे. या देणगीतून टंचाईग्रस्त गावांना नियमित पाणी पुरवठा केला जात आहे.
निसर्गरम्य चिपळूण आणि निसर्गरम्य संगमेश्वर फेसबुक ग्रुपच्या माध्यमातून दीपक पवार, गणपत दाभोळकर, उदय मालप, नरेंद्र खानविलकर, मुकुंद सनगरे योगेश मालप नितेश मालप अरुण मालप तसेच अंत्रवली शेरेवाडीतील ग्रामस्थांनी विशेष सहकार्य केले आहे.


तसेच मुंबई आणि ठाण्यातील दानशूर व्यक्ती, संस्था यांनीही मदतीचा हात पुढे केला आहे. सरकारी अनास्था आणि दिरंगाई तसेच इच्छाशक्तीचा अभाव असणार्या राजकारण्यांच्या डोळ्यात झणझणीत अंजन टाकण्याचे काम या तरुणाईने
केल्याचे समाधान समूह प्रमुख संदेश जिमन यांनी व्यक्त केले.