अवघ्या 92 दिवसात राजापूरची गंगामाई पुन्हा प्रगटली ...भाविकांची गर्दी वाढतेय

अवघ्या 92 दिवसात राजापूरची गंगामाई पुन्हा प्रगटली ...भाविकांची गर्दी वाढतेय

साधारणपणे दर तीन वर्षांनी येणारी अशी ख्याती असलेल्या राजापूरच्या गंगेचे वेळापत्रक सद्या बदललेले दिसून येत आहे. या नैसर्गिक बदलाची चर्चा सुरू असतानाच फेब्रुवारीमध्ये निर्गमन झालेल्या गंगेचे पुन्हा १५ मे रोजी आगमन झाले आहे. मात्र यावेळी गंगाआगमनाच्या वृत्ताबाबत गंगापूत्रांकडून माहिती प्रसृत न झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

 
राजापूरची प्रसिध्द असलेली व उन्हाळे क्षेत्री प्रगट होणारी गंगा साधारणपणे तीन वर्षांनी अवतरत असल्याचा इतिहास होता. हा इतिहास अनेक दशके अबाधित होता. मात्र ज्यावेळी गंगाक्षेत्री पाण्याच्या सुविधेसाठी विंधन विहिर खोदण्यात आली त्यानंतर गंगा आगमनाचे तसे निश्चित वेळापत्रक बदलले गेल्याचे दिसून आले. त्यानंतर बऱ्याचदा वर्षांतून दोनदा गंगामाई प्रगट होऊ लागली शिवाय वास्तव्याचा कालावधीही लांबत असल्याचे निदर्शनास आले. काशीकुंड व मुळगंगा येथील प्रवाह खंडीत झाल्यानंतर त्याचवेळी गंगामाईचे निर्गमन समजले जात असते. मात्र सद्य स्थितीत कुंडे पूर्णपणे रिकामी होत नसल्याने त्याबद्दलही आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

यापूर्वी ३० एप्रिल २०२१ ला गंगेचे आगमन झाले होते. मात्र कोविडमुळे या काळात गंगाक्षेत्री गंगाभक्तांना स्नानासाठी मनाई करण्यात आलेली होती. यावेळी आलेल्या गंगेचे तब्बल २८८ दिवसांनी म्हणजेच १२ फेब्रुवारी २०२२ रोजी निर्गमन झाले होते. त्याला काही दिवसांचा कालावधी उलटतो न तोच पुन्हा १५ मे २०२२ रोजी ९२ दिवसांनी गंगामाई पुन्हा प्रगटली आहे. सद्या काशीकुंड तुडुंब भरून गोमुखातून वाहत असून मुळगंगेसह सर्वच कुंडात मोठ्या प्रमाणात गंगाजल अवतरलेले आहे. गंगास्नानासाठी मात्र भाविकांची तुरळक गर्दी होत आहे.