लांजा तालुक्यात राज्यस्तरीय बैलगाडी स्पर्धा
लांजा. तालुक्यातील आसगे येथे रविवारी ३ एप्रिल रोजी आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय बैलगाडी स्पर्धेत संगमेश्वर देवळे येथील आदित्य शिर्के यांच्या बैलगाडीने प्रथम क्रमांक पटकावला.
आसगे पंचक्रोशी शेतकरी मंडळ मंडळाच्या वतीने या राज्यस्तरीय बैलगाडी शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचे उद्घाटन लांजा च्या नायब तहसीलदार उज्वला केळूसकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून नायब तहसीलदार उज्वला केळूसकर यांच्यासह लांजा चे प्रभारी गटविकास अधिकारी संतोष म्हेत्रे तसेच पशुधन अधिकारी श्रीमती बर्गे, मंडळाचे अध्यक्ष अनिल देसाई, आसगे सरपंच सौ अनुष्का गुरव, महेश सप्रे आदी मान्यवर उपस्थित होते
या राज्यस्तरीय बैलगाडी स्पर्धेत एकूण ६६ संघ सहभागी झाले होते. गेल्या दोन वर्षांच्या कोरोनाच्या संकटा नंतर प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या या विना काठी बैलगाडी स्पर्धेला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद लाभला. ही स्पर्धा घाटी आणि गावठी अशा प्रकारात घेण्यात आली.
या राज्यस्तरीय स्पर्धेत संगमेश्वर देवळे येथील आदित्य शिर्केंच्या बैलगाडीने प्रथम क्रमांक पटकावला. द्वितीय क्रमांक कोसुंब संगमेश्वर येथील किरण जाधव यांच्या बैलगाडीने पटकावला. तृतीय क्रमांक बोंडये संगमेश्वर येथील रोशन किर्वे यांच्या गाडीने पटकावला .चौथा क्रमांक शाहूवाडी वारूळ येथील केशव कोंडीबा सपकाळ यांच्या गाडीने तर पाचवा क्रमांक संगमेश्वर मेघी येथील प्रशांत बेटकर यांच्या गाडीने पटकावला.
याबरोबरच गावठी बैलजोडीच्या प्रकारात सुनील गोपाळ पाटगाव यांच्या गाडीने प्रथम क्रमांक पटकावला. द्वितीय क्रमांक गोळवली येथील अमोल किंजळकर यांच्या गाडीने, तृतीय क्रमांक गोळवली येथील मल्लू कींजळकर यांच्या गाडीने पटकावला. तर आसगे गाव मर्यादित स्पर्धेत रमेश पावसकर यांच्या गाडीने प्रथम क्रमांक पटकावला. द्वितीय क्रमांक अब्बास पाटणकर यांच्या गाडीने तर तृतीय क्रमांक भाई मांडवकर यांच्या गाडीने पटकावला.
स्पर्धेसाठी पंच म्हणून रविंद्र वासूरकर, प्रकाश हर्चेकर ,अल्लाउद्दीन नेवरेकर यांनी काम पाहिले.
Bni salah transfer