रत्नागिरी हातखंबा तिठ्यावर पकडले जिवंत गावठी बॉम्ब

रत्नागिरी हातखंबा तिठ्यावर पकडले जिवंत गावठी बॉम्ब

रत्नागिरी तालुक्याती मुंबई गोवा महामार्गाजवळ असलेल्या हातखंबा तिठा येथे 9 जिवंत गावठी बाँब घेऊन रत्नागिरीत येणार्‍या वेंगुर्ल्याच्या दोघांना दहशतवाद विरोधी पथकाने ताब्यात घेतल्याने खळबळ उडाली आहे. ही कारवाई शनिवार 15 जानेवारी रोजी सायंकाळी उशिरा करण्यात आली. शनिवारी सायंकाळी दोन तरूण गावठी हातबाँब घेऊन रत्नागिरीत येणार असल्याची गोपनीय माहिती रत्नागिरी जिल्ह्याच्या दहशतवाद विरोधी पथकाला मिळाली होती.यावरुन पथकाने सापळा रचून ही मोठी कारवाई केली आहे. 
  याप्रकरणी रामा सुरेश पालयेकर (वय 22, रा.वरचा वडखोल, वेंगुर्ला) आणि श्रीकृष्ण केशव हदळणकर ( वय 24, रा. गावडेश्वर मंदिर वेंगुर्ला )अशी ताब्यात घेण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत.                                                    

 रत्नागिरीच्या दहशतवाद विरोधी पथकाने या दोघांनाही ताब्यात घेऊन पुढील कारवाईसाठी ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात दिले. ग्रामीण पोलिसांनी दोन्ही संशयितांना अटक करून रविवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोघांनाही दोन दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. 

याबाबत पोलिस हेड काँस्टेबल उदय चांदणे यांंनी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. शनिवारी सायंकाळी 7.30 वा. सुमारास या पथकाला पालीहून रत्नागिरीच्या दिशेने येणार्‍या दुचाकी (एमएच-07-एपी-2700) वरील दोघांचे वर्तन संशयास्पद वाटल्याने या पथकाने त्यांची दुचाकी थांबवली. त्यांची कसून चौकशी केल्यावर त्यांच्याजवळ 9 जिवंत गावठी बाँब या पथकाला मिळाले आहेत.