22 कोटींची व्हेल माशाची उलटी जप्त सहा आरोपी ताब्यात

22 कोटींची व्हेल माशाची उलटी जप्त सहा आरोपी ताब्यात
सौजन्य पुढारी

कोकण लाईव्ह डिजिटल न्यूज

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड समुद्रात व्हेल माशाच्या उलटी ची तस्करी होणार असल्याची गोपनीय माहिती  स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखा सिंधुदुर्गच्या पथकाला मिळाली होती त्यानंतर या ठिकाणी असलेल्या पवनचक्की गार्डनसमोर सापळा रचून चार संशयित पुरुष व दोन महिलांना ताब्यात घेत त्यांच्याकडून 22 किलो 370 ग्रॅम वजनाचा सुमारे व्हेल माशाची उलटीसदृश्य पदार्थ जप्त करण्यात आला. त्याची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारात 22 कोटी 37 लाख इतकी असल्याची स्पष्ट झाले आहे.


तसेच संशयित आरोपींकडून एक चारचाकी, एक दुचाकीही हस्तगत करण्यात आली आहे. ही कारवाई गुरुवारी सायंकाळच्या सुमारास करण्यात आली. सिंधुदुर्ग जिल्हा नैसर्गिकदृष्ट्या संपन्न असून समुद्र किनारे जलचरांनी समृध्द आहेत. परंतु समुद्रामध्ये वावरणार्‍या संरक्षित जलचरांच्या अवयवांची तस्करी करण्याचा प्रयत्न काही जणांकडून होत असतो. त्याला आळा घालण्याकरिता परिणामकारक कारवाईचे आदेश जिल्हा पोलिस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांनी दिले होते. 

गुरुवारी स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक महेंद्र घाग यांना त्यांच्या बातमीदारामार्फत देवगड समुद्रात व्हेल माशाच्या उलटीची तस्करी होणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार सापळा रचून सहा संशयित आरोपींकडून त्यांची तपासणी करत 22 कोटी 37 लाखांची व्हेल माशाची उलटीसदृश्य पदार्थ जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी आरोपींविरूध्द भारतीय वन्यजीव संरक्षण अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलिस अधीक्षक राजेंद्र दाभाडे, उपअधीक्षक नितीन बगाटे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे प्रभारी पोलिस निरीक्षक संदीप भोसले, सहाय्यक पोलिस निरीक्षक महेंद्र घाग, पोलिस हवालदार आशिष गंगावणे, प्रकाश कदम, अनुपकुमार खंडे, अनिल धुरी, प्रमोद काळसेकर, रूपाली खानोलकर, अमित तेली, संकेत खाडये, रवी इंगळे, प्रथमेश गावडे, यशवंत आरमारकर यांनी केली. अधिक तपास देवगड पोलिस ठाण्याकडून केला जात आहे.