गणेशोत्सवात चाकरमान्यांसाठी एसटीची चोख व्यवस्था; २३१० अतिरिक्त बसेस
कोकण लाईव्ह डिजिटल न्यूज
दोन वर्षानंतर गणेशोत्सव कोणत्याही निर्बंधाशिवाय मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. मुंबई व महानगरातील अनेक चाकरमानी गणेशोत्सवात गावी जातात. कोकणातील गणेशोत्सवासाठी एसटी महामंडळाने यावर्षी जय्यत तयारी केली आहे. काही दिवसांवर असलेल्या गणेश उत्सवासाठी एसटी महामंडळाकडून २३१० जादा बसेस सोडण्यात येणार आहेत.
यंदा बाप्पाचे आगमन ३१ ऑगस्ट रोजी होणार आहे. अवघ्या काही दिवसांवर असलेल्या गणेशोत्सवाची जोरदार तयारी सर्वत्र सुरू झाली आहे. एसटी महामंडळाकडून २५ ऑगस्ट ते ३१ ऑगस्ट २०२२ या कालावधीत जादा बसेस सोडण्यात येणार आहेत. ग्रुप आरक्षणासाठी मुंबई, ठाणे, पालघर या विभागातून १२६८ बसेस असणार आहेत. तर, वैयक्तिक आरक्षण करणाऱ्यांसाठी ८७२ बसेस असणार आहेत. ग्रुप आरक्षणासाठी मुंबई विभागातून ६६७ , पालघर विभागातून ३१३ आणि ठाणे विभागातून २८८ बसेस असणार आहेत.
अतिवृष्टी, दरड कोसळणे किंवा अन्य काही घटना घडल्यास किंवा रेल्वे प्रवासात अडचणी निर्माण झाल्यास कोकणातील प्रमूख स्थानकात १०० अतिरिक्त गाड्यांचं नियोजन एसटी महामंडळाने केले आहे. त्याचबरोबर, पावसामुळे खराब झालेले रस्ते आणि त्यामुळे टायर पंक्चर होण्याचे प्रमाण वाढण्यासाठी शक्यता लक्षात घेऊन एसटी महामंडळाने मुंबई-गोवा महामार्गावरील आगार आणि दुरुस्ती पथकामध्ये नेहमीपेक्षा प्रत्येकी किमान १० अतिरिक्त टायर ठेवण्याची सूचना महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. त्याशिवाय, घाटात सुरक्षितपणे वाहतूक चालवावी अशी विशेष सूचनाही देण्यात आल्या आहेत. गणेशोत्सवानंतर ५ सप्टेंबर ते ११ सप्टेंबर दरम्यान कोकणातून मुंबई व ईतर महत्वाच्या ठिकाणी अधिक बसही सोडण्यात येणार आहेत.
Bni salah transfer